Friday 28 February 2014

खरोखरच अतुल्य भारत !

भारताचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा यामुळे फार मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आपल्या देशाकडे आहे.  देशाला विकसित राष्ट्र बनविण्यात पर्यटन क्षेत्राची काय भूमिका असणार हे आज पाहूया…

भारताच्या भूमीने आणि इथल्या समृद्धीने सदैव परदेशी पर्यटकांना आपलेसे केले आहे. प्राचीन काळापासून भारतात मोठ्या प्रमाणात परकीय प्रवासी बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी भारतात येत होते. युआन श्वांग, फा-हीन हे बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी तर ईब्न बतुता, अल- बेरुनी हे  पर्यटक इतर कारणांनी भारतात येउन गेल्याचे आपणास माहित आहे. आजच्या काळात पर्यटन हे कोणत्याही देशाच्या विकासासाठी एक आवश्यक साधन बनू शकते. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था केवळ त्या देशातील पर्यटनावर आधारित आहे. म्हणजे एका संपूर्ण देशाला चालविण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. परकीय चलन कमविण्याचे एक प्रभावी साधन म्हणून या क्षेत्राकडे पाहिले जाऊ शकते. भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास असून मध्य प्रदेशातील भीमबेटका या ठिकाणी अश्मयुगीन काळातील भिंतीचीत्रे सापडली आहेत. जगातील इतर नव्या संस्कृतींना ५००० वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेल्या आपल्या संस्कृतीची शक्तीस्थळे दाखविणे ही एक अभिमानास्पद बाब होय. भारतातल्या मातीत, वाऱ्यात एक समृद्ध इतिहासाचा सुगंध दरवळतो. 

२०१२ या वर्षात ६.६५ दशलक्ष विदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली. यातून भारताला ९४ हजार ४८७ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. १३ टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह भारताला पर्यटनातून मिळणारे उत्पन्न २०१५ पर्यंत २६ बिलियन डॉलर इतके वाढू शकते असा असोचेम चा अंदाज आहे. यावेळी पर्यटकांची संख्याही वाढून ८ दशलक्ष पर्यंत जाऊ शकते. सद्यस्थितीत महाराष्ट्र(२५%), तामिळनाडू(१७%), दिल्ली(११%), उत्तर प्रदेश(१०%), राजस्थान(७%) ही पाच राज्ये पर्यटकांना आकर्षित करण्यात आघाडीवर आहेत. ही पाच राज्ये मिळून एकूण पर्यटकांपैकी ७० टक्के पर्यटकांना खेचतात. पर्यटन क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा ६.६ टक्के असून यामध्यातून ७.७ टक्के रोजगाराची निर्मिती होते. या क्षेत्रातील एकूण गुंतवणूक ही ६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पेट्रोलियम पदार्थ, दागिने आणि दळणवळण संसाधने यानंतर परकीय चलन मिळवून देणारे पर्यटन हे चौथे सर्वात मोठे क्षेत्र आहे.

भारताच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासोबतच पर्यटक भारतातील प्राचीन आयुर्वेदिक उपचार घेण्याच्या हेतूने अथवा कृषी पर्यटनासाठी भारतात येतात. भारतीय जंगलात जगातील अनेक दुर्मिळ प्रजातींचे वास्तव्य आहे. वाघांच्या जगातील एकूण संख्येपैकी निम्मे वाघ भारतात आहेत. पश्चिम घाट हे किंग कोब्राचे नैसर्गिक निवासस्थान आहे. भारतात पर्यटक म्हणून येणाऱ्यांमध्ये परकीय नागरीकांचाच समावेश असतो असे नाही तर दरवर्षी सैबेरियन क्रेनसारखे स्थलांतरित पक्षी ७००० किमी प्रवास करून लाखोंच्या संख्येने भरतपूर, नांदुरमध्यमेश्वर या ठिकाणी येतात. उत्तर भारतातील शिमला, कुलू मनाली, मसुरी, नैनिताल, काश्मीर ही नैसर्गिक सौंदर्याने नटलेली स्थळे भारताच्या डोक्यावरील मुकुटाप्रमाणे आहेत. तर सोमनाथ, खजुराहो, कोणार्क येथील मंदिरे, सांचीचा स्तूप, ताजमहाल, गुलाबी शहर जयपूर, नवाबांचे शहर लखनौ हे भारताचे हृदयस्थान आहेत. भारताच्या दक्षिणेला तसेच नैऋत्य आणि आग्नेयेस समुद्र असल्याने अनेक सुंदर बीचेस आहेत.

प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मक अहवाल-२०१३ (The Travel and Tourism Competitiveness Report-2013) नुसार पर्यटनाच्या बाबतीत जगातील १४४ देशात भारताचा ६५ वा  क्रमांक लागतो. याच अहवालानुसार १४४ देशातील पर्यटनासाठी येणाऱ्या प्रवासखर्चाच्या बाबतीत भारताचा २० वा क्रमांक लागतो. तसेच देशातील हवाई प्रवासाच्या सोयी उत्तम असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. भारत जगातील असा एकमेव देश असेल ज्या देशात मोठ्या प्रमाणात विविध सण साजरे केले जातात. त्यामुळे विदेशी पर्यटकांना भारतीय सण- उत्सव याविषयी प्रचंड आकर्षण आहे. भारतातील विविध उत्सवांच्या वेळी विदेशी पर्यटकांचे अस्तित्व सहज नजरेस पडते. भारतातील होळी, दिवाळी सण अगदी आत्मीयतेने साजरे करताना या पर्यटकांचे छायाचित्र आपण वृत्तपत्रातून पाहतो.

भारताचा उत्तरदक्षिण आणि पूर्वपश्चिम विस्तार पाहता देशाच्या चारही टोकांची भौगोलिक परिस्थिती, भौगोलिक रचना, उदरनिर्वाहाची साधने, वातावरण पूर्णपणे भिन्न असल्याने एकट्या भारतात वैविध्यपूर्ण पर्यटन होऊ शकते. भारताच्या ईशान्य भागातील लोकजीवन, संस्कृतीविषयी उर्वरित भारतास नेहमीच आकर्षण असल्याने ह्या भागाचा पर्यटनासाठी विकास करणे जितके गरजेचे आहे तितकेच त्या ठिकाणी सुरक्षितता देणेही गरजेचे आहे. उत्तर भारतात गेल्या वर्षी आलेली नैसर्गिक आपत्ती आपण पहिलीच आहे. तेव्हा निसर्गाच्या क्षमतेपेक्षा जास्त ताण कुठल्याही स्थळावर पडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्ती तलत येवू शकत नसल्या तरी काळजी घेतल्यास त्यामुळे होणारी हानी टाळता येऊ शकते.


भारतीय डायस्पोरा( अर्थ: जगातील अशा व्यक्तींचा समूह ज्यांचे  पूर्वज एका देशाचे रहिवासी होते) हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा डायस्पोरा आहे. तेव्हा जगभर पसरलेल्या  करोडो भारतीयांचे अजूनही भारतासोबत सांस्कृतिक, भावनिक, वंशिक नाते असल्याने ते धार्मिक, व्यावसायिक कामानिमित्ताने भारतात येतात. दरवर्षी ९ जानेवारी ( या दिवशी महात्मा गांधी 'भारताचे सर्वात महान प्रवासी' दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते ) हा दिवस 'प्रवासी भारतीय दिवस' म्हणून साजरा केला जातो. भारत हिंदू, शीख, जैन, बौद्ध इत्यादी धर्मांचे उगमस्थान असून मुस्लिम समुदाय ही मोठ्या प्रमाणात येथे राहत असल्याने ह्या सर्व समुदायाचे जगभरातील बांधव भारतात येत असतात. 

भारतीय पर्यटन क्षेत्राला इतका जुना इतिहास असूनही आज जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय पर्यटन स्थळे पर्यटक आकर्षित खेचण्यात खूप पिछाडीवर आहेत. पर्यटकांना खेचण्यासाठी लागणाऱ्या विविध सुधारणांची गरज भारतास आहे. त्याचप्रमाणे देशातील महिलांवरील हल्ल्यांमुळे विदेशी महिला पर्यटकांची संख्याही गेल्या काही वर्षात घटली आहे. भारताने कधीही मानव विकास निर्देशांक आणि ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये पहिल्या शंभरात स्थान मिळवलेले नाही. दहशतवाद, महिला अत्याचार, परकीय प्रवाशांची लुबाडणूक यांमुळे जगभरात भारताविषयीचे चित्र उत्तम नाही. भारतात जागतिक स्थरावरील पर्यटक केंद्रांचा विकास होणे गरजेचे आहे. यासाठी जगभरातील विविध देशांसोबत परस्पर सहकार्य करार केल्यास पर्यटन विकासास चालना मिळू शकते. स्वामी विवेकानंदांची आणि महात्मा गांधीजींची भूमी यासह भारताची नवी वैश्विक ओळख बनविण्यास काहीच हरकत नसावी मात्र त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज असून काही मोजक्याच स्थळांचा विकास न करता देशातील प्रत्येक राज्यास, शहरास एकमेवाद्वितीय ओळख देण्याची गरज आहे.










No comments:

Post a Comment