Monday 3 March 2014

भारत माझा देश आहे.......

जगात कोणतीही गोष्ट दोनदा बनते. पहिल्यांदा बनविणाऱ्याच्या मनात आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात.  भारताला महासत्ता होताना पाहणे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न झाल्यास भारत नक्कीच आणि लवकरच एक महासत्ता होणार. महासत्ता होणाऱ्या भारताचे स्वप्न पाहतांना वास्तविकतेचे भान ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. भारतीयांच्या मानसिकतेविषयी आज बोलावेसे वाटते……

शाळेत असल्यापासून आपले कोवळ मन 'भारत माझा देश आहे' असे म्हणते. भारत म्हणजे काय? माझा म्हणजे कोणाचा? देश म्हणजे काय? हे त्या वयात कळत नसते. मात्र फक्त घोकंपट्टी करून आपण देशाप्रती आपला प्रेम, कर्तव्य, आदर व्यक्त करून मोकळे होतो. शाळेच्या त्या वयात आपण आपले कर्तव्य पार पाडण्यात कमी पडलो तरी वयामानानुसार ते मान्य केले जाऊ शकते. पण सज्ञान झाल्यानंतर जर आपण कर्तव्य पार पाडण्यात कमी पडत असू तर तो गुन्हाच ठरतो. मात्र हा गुन्हा इतका सर्वदूर पसरलेला आहे की, तो गुन्हा नसल्याचेच सर्वमान्य झाले आहे. या गुन्ह्याची वाढलेली पातळी आता सर्वांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

आपला ऐतिहास वारसा, समृद्धी, परंपरा यांचे जतन करणे हे आपले परमकर्तव्य आहे. मात्र अज्ञान आणि अंध:कारात राहिलेला आपला देश ह्या वारस्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळेच ऐतिहासिकदृष्ट्या  महत्वाची स्थळे, महत्वाच्या व्यक्तींची स्मारके यांची हवी तशी काळजी घेतली जात नाही. फक्त संबंधित व्यक्तीच्या जयंती आणि पुण्यतिथीच्यावेळी प्रसिद्धीसाठी त्या स्थळांना भेटी दिल्या जातात. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वांनी वेळोवेळी या स्थळांना भेटी देऊन त्यांची नियमित निगा राखली जावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विविध संस्कृतींचा मिलाप होऊन आपली महान भारतीय संस्कृती बनलेली आहे. मात्र काही समाजविघातक घटक स्वतःच्या फायद्यासाठी देशाच्या ऐक्यास बाधा आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तरुणांनी त्यांच्या भूलथापांना बळी न पडता 'ऐक्य हेच आपले शक्तिस्थळ' असल्याचे स्मरणात ठेवावे. देशभक्ती, देशप्रेम ह्या भावना वृद्धिंगत करण्यावर भर द्यावा.

आपण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संसदीय लोकशाही पद्धत स्वीकारली आहे. प्रौढ मतदानाच्या माध्यमातून आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो. त्यामुळे मतदान करणे हे देखील आपले कर्तव्य आहे. मतदान करून आपण एक स्थिर आणि सक्षम सरकार निवडले तर आपल्या मागण्यांसाठी रस्त्यांवर उतरण्याची वेळ येणार नाही. कायदे व नियम हे सर्वांसाठीच असतात म्हणून सर्वांनी त्यांचे काटेकोर पालन करावे. आपला भारत देश गेली कित्येक शतके  पारतंत्र्यात होता. त्यामुळे देशाचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण झालेले आहे. देशाची बहुसंख्य जनता आज ही गरिबीत जीवन जगत आहे. त्यामुळे ज्ञान, विज्ञान शिक्षणाचा तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत प्रसार करणे, हे देखील आपले कर्तव्य आहे. मुळात पायाभूत सोयीसुविधा पुरविणे हे सरकारचे काम असले, तरी  १२० कोटी लोकसंख्येच्या देशाचा राज्यकारभार चालविणे हे तितकेसे सोपे काम नाही. तेव्हा ज्या गरजू व्यक्तींपर्यंत शिक्षणाची गंगा अद्याप पोहचलेली नाही, त्यांना आपण किमान साक्षर बनविण्याचे काम हाती घेतले तरी  देशाच्या विकासाला  चालना मिळेल.

या व्यतिरिक्त देशाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणे, साहित्य, क्रीडा,संशोधन या क्षेत्रात नवनवीन शिखरे गाठणे हे आपले कर्तव्य आहे. बैलगाडीवरून अण्वस्त्र वाहणारा 'गरिबांचा श्रीमंत' देश असे भारताला हिणवले जाते . तेव्हा आपण सर्वांनी प्रयत्न केल्यास भारताची प्रतिमा बदलण्यास हातभार लागेल . गेल्या २-३ वर्षात भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनात आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकांत देशातील तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदवून बदल घडवून आणला, अशाच पद्धतीने देशातील युवक एकत्र आल्यास, मोठ्याप्रमाणात देशाचा विकास होईल. 

1 comment:

  1. प्रत्येकाने स्वतःच्या परीने योगदान दिले तर नक्कीच महासत्ता होणे अवघड जाणार नाही.
    भारत माझा देश आहे,असे फक्त न म्हणता ते आचरणात आणण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन.

    ReplyDelete