भारताने स्वकष्टावर अवकाश संशोधन क्षेत्रात केलेली प्रगती नक्कीच उल्लेखनीय अशी आहे. भारताने वारंवार सिद्ध केले आहे, की त्यास अंतराळ संशोधन क्षेत्रात एका महासत्ता म्हणून ओळखले जाते. भारताच्या अवकाश संशोधनाचा घेतलेला हा वेध……
प्राचीन काळापासून भारतीयांना अवकाशाचे ज्ञान अवगत आहे. पाचव्या शतकातील प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य ज्यांनी जगाला शून्य हा अंक दिला. त्यांना खगोलशास्त्राचेही उत्तम ज्ञान होते. त्यामुळे १९७५ मध्ये भारताने जेव्हा आपला पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला तेव्हा त्यास भास्कराचार्य यांचे नाव देऊन त्यांचा गौरव केला. डॉ . विक्रम साराभाई यांनी आधुनिक काळात भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे पुनरुज्जीवन केले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था( इस्त्रो ) मार्फत विविध उपक्रम हाती घेतले जातात. जसे की उपग्रहमार्फत दळणवळण विकास, पृथ्वीचे सर्वेक्षण, अग्निबाणाची निर्मिती, अंतराळ विज्ञानाचा विकास आणि आपत्ती काळात मदत करणे हे होय. उपग्रहांचे भूस्थिर उपग्रह आणि सर्वेक्षण उपग्रह असे दोन प्रकार पडतात. सर्वेक्षण उपग्रहाच्या मदतीने मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे भूजल पातळीचा अभ्यास करणे, कृषी-हवामान नियोजन, मत्यव्यवसायाची क्षमता जाणणे, सागरी जीवसृष्टीचा अभ्यास, चहाच्या मळ्यांचा अभ्यास आणि शहरांच्या नियोजनासाठी उपयोग होतो. सर्वेक्षण उपग्रह तुलनेने कमी उंचीवर असतात. ३५ हजारांपेक्षा अधिक उंचीवर भूस्थिर उपग्रहाचा जलद गतीने दळणवळणासाठी उपयोग होतो.
केवळ १५ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत भारताचे मंगळयान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी अवकाशात झेपावले. अंतराळ संशोधनात भारत खरंच एक महासत्ता असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. यापूर्वीही भारताच्या यशस्वी 'चंद्रयान- १' मोहिमेने हे सिद्ध केलेलेच आहे. अमेरिका व रशिया यांच्या यशस्वी मंगळ मोहिमेसाठी जितका खर्च आला त्याच्या एक दशांश खर्चात भारताची मंगळ मोहीम मार्गक्रमण करत आहे. २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताचे मंगलयान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे ही मोहिम किती यशस्वी झाली ते समजेल. मात्र आज या मोहिमेला १०० दिवस उलटले असून भारताचे मंगलयान अपेक्षेप्रमाणे प्रवास करीत आहे. अमेरिका, रशिया आणि युरोपीय संघ यानंतर केवळ भारत हा मंगळ मोहीम यशस्वी करणारा जगातला चौथा देश ठरेल. जगातील एक विकसित देश असलेला जपान आणि उदयन्मुख महासत्ता चीन यांच्या मंगळ मोहिम अयशस्वी ठरल्या आहेत.
गगन या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत भारत स्वतःची जीपीएस प्रणाली बनवत आहे. या प्रणालीमुळे भारतीय उपखंडाचे जास्त अचूक आणि स्वस्त चित्र भारतीय वापरकर्त्याला पाहता येणार आहे. सध्या कनडा, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी या प्रणालीशी जुळणारी आपली स्वतःची यंत्रणा वापरात आणली आहे. चांद्रयान-१ या भारताच्या मोहिमेने चंद्रावर पाण्याचे अस्तित्व शोधले असून या मोहिमेचा पुढचा भाग म्हणून लवकरच भारत चांद्रयान-२ ही मोहीम हातही घेणार आहे. या मोहिमेतून चंद्राच्या पृष्टभागावरील खनिजांचा वेध घेऊन त्यांचे विश्लेषण करणार आहे. त्याचप्रमाणे 'आदित्य-१' या मोहिमेंतर्गत सूर्याच्या पृष्टभागावर होणाऱ्या विविध भौतिक क्रियांचा अभ्यास केला जाणार आहे. द्रवरूप हायड्रोजन किंवा ऑक्सिजनचा इंधन म्हणून वापर करण्याच्या तंत्रज्ञानाला क्रायोजेनिक तंत्रज्ञान म्हणतात. आधुनिक अवकाश संशोधन कार्यासाठी या तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्व आहे. भारताकडे आज क्रायोजेनिक तंत्रज्ञान असल्याने भारताला अंतराळ संशोधनात विकासाच्या संधी वाढल्या आहेत.
No comments:
Post a Comment