Wednesday, 29 January 2014

भारताच्या विकासाची दिशा

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी देशाला एक स्वप्न दिले आहे. २०२० पर्यंत भारत जागतिक महासत्ता होणार असा त्यांचा अभ्यासपूर्ण अंदाज आहे. प्रत्येक भारतीयाने त्यासाठी प्रयत्न केल्यास हे स्वप्न सत्यात उतरायला वेळ नाही लागणार. खरे तर (सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्ट्या ) महासत्ता होणे हे भारतासाठी काही नवीन नाही . ५००० वर्षांपूर्वी जगभरातील सर्व मानवी (संस्कृती) वसाहती नागरीकीकारणापासून शेकडो वर्ष दूर असतांना भारतात जगातील तत्कालीन सर्वात प्रगत संस्कृती नांदत होती. काळाच्या ओघात अनेक परकीय आक्रमणे पचवितांना १८ व्या शतकापर्यंत भारतीय समाज जगाच्या तुलनेने पुष्कळ मागे गेला. कालांतराने ब्रिटीश सत्तेचा भारतात पाया रोवला गेला आणि भारतात आधुनिकीकरणाचे वारे वाहू लागले, मात्र याचा अर्थ असा होत नाही की, ब्रिटीश राजवट भारताला मध्ययुगीन सरंजामशाही व्यवस्थेपासून मुक्त करण्यासाठी आली होती. इंग्रज भारतात आले होते कारण त्यांच्या पूर्वजांपासून त्यांनी पूर्वेकडील या देशाच्या समृद्धीच्या कथा ऐकल्या होत्या. असे म्हणणे वावगे ठरणार नाही की, जगभरातील आपल्या वसाहतींच्या लुटीतून मिळविलेल्या संपत्तीच्या जोरावर इंग्लंडचा विकास झाला.

२०० वर्षात ब्रिटिशांनी भारताची प्रचंड आर्थिक पिळवणूक केली. १९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी उपासमार, निरक्षरता, महागाई, अर्थव्यवस्थेचा अल्प विकासदर अशा अनेक समस्या भारतासमोर होत्या. येणाऱ्या काळात भारत इतक्या झपाट्याने प्रगती करेल, असे इंग्लंड-अमेरिका यांना मुळीच वाटले नव्हते. मुळात भारत एक देश म्हणून तरी टिकेल काय? अशी खात्री ही त्यांना त्यावेळी वाटत नसेल. परंतु भारताच्या मातीत असलेल्या नवनिर्माणाच्या गुणामुळे तिची लेकरे जगाच्या पाठीवर लवकरच ताठ मानेने उठून उभी राहिलीत. आपल्या समोरील एक एक आव्हानांना तोंड देत भारताने जगात स्वत: चे भक्कम स्थान निर्माण  केले.




गेल्या दशकात चीन नंतर सर्वात जास्त विकासाचा दर राखणारा देश भारत होता. काही मर्यादित क्षेत्राचा विकास झाल्यामुळे देशातील एक मोठा वर्ग अजूनही विकासापासून दूर आहे. त्यामुळे आर्थिक विषमता सतत वाढतच  आहे. ही वाढत जाणारी विषमतेची दरी कमी करायची असेल तर भारताला निरंतर सुधारणांची गरज आहे.

भारत २०२० पर्यंत एक जागतिक महासत्ता कसा होणार? हे समजण्यासाठी भारताचा आजपर्यंतचा विकास कसा झाला, हे अभ्यासाने देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, उर्जा, औद्यागिक इत्यादी क्षेत्रांतील प्रवास अभ्यासावा लागेल. याशिवाय संरक्षण सिद्धता, अवकाश संशोधन, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण यांचा देखील स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. कधीकाळी उपासमार, भुकबळीने त्रस्त असलेला आपला देश आज स्वतःची अन्नधान्याची गरज स्वतः भागवू शकतो. सुईपासून तर अगदी मिसाईल पर्यंत बहुतेक गरजेच्या वस्तू  देशातच आपण बनवू शकतो. जगातील कितीतरी लहान व गरीब देश भारताकडे आदराने तर भारताच्या प्रगतीकडे कुतूहलाने पाहतात. इतकेच नव्हे तर प्रगत देशही भारताकडे एक प्रभावशाली देश म्हणून पाहत आहेत. येत्या काळात आपण सर्वांनी  जिद्दीने प्रयत्न केल्यास विकसित भारताचे स्वप्न लवकरच आत्मसात करता येईल.

चला तर मग आजपासूनच विकसित, समृद्ध, भारताचे स्वप्न पाहूया !



3 comments: